समजा कोणी तुमच्या मुस्कटीत मारली तर ? - पु। ल। देशपांडे
समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..पु.ल. देशपांडे"घाबरू नका-मारा बुक्की." मी उगीचच टिचकी मारल्यासारखी बुक्की मारली."असे घाबरता काय? हाणा जोरदार बुक्की! अहो एका बुक्कीत आम्ही सुपारीची भुगटी पाडीत होतो.""वा हॅ हॅ..." माझी क्षीण हास्य. क्षणापूर्वीच तर हा म्हणाला होता की आपल्याला सुपारीच्या खांडाचेसुद्धा व्यसन नाही म्हणून."हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही बंधो. येत्या नारळी पौर्णिमेला पंचाहत्तर पुरी होताहेत-दात पहा."`अहा मज ऎसा दैवहत प्रा आ आ आ आ आणीखचित जगती या दिसत नसे को ओ ओ ओ ओ ओणी.'असे आपल्याला वाटत असते असला हा प्रसंग होता. एका लग्नाच्या मांडवात मी एका टणक म्हाताऱ्याच्या तावडीत सापडलो होतो. हल्ली सहसा मी लग्नाचे सगळे अंक पाहायला जात नाही. पानसुपारीच्या अंकाला तेवढा जातो. कारण दिवसभर मांडवात असंख्य अनोळखी लोकांच्यात वेळ काढायचा म्हणजे धर्मसंकट असते. राशिभविश्यापासून संकर पिकापर्यंत कोण कूठला विषय मांडून बसेल काही सांगता येत नाही. त्यातून आपण वधूसारख्या नरम बाजूचे असलो तर मुकाट्य़ाने सारे काही घ्यावे लागते. मी मात्र पूर्वीपासून एक धोरण सांभाळले आहे. लग्नाच्या मांडव्यात आपल्याशी बोलायला येणारा प्रत्येक इसम हा वरपक्षातला गुप्तहेर असावा अशा सावधगिरीने मी बोलतो. त्यामुळे एकाच मांडवात मी कॉंग्रेस, जनसंघ आणि द्रविड मुन्नेत्र कहढळखगम ह्या सगळ्या पक्षांना आळीपाळीने पाठिंबा दिला आहे. द्रविड मुन्नेत्र नंतरच्या त्या शब्दाचा उच्चार जीभ टाळूला नेमक्या कुठल्या ठिकाणी लावून करायचा असतो हे शिक्षण मला एका गृहस्थाने त्या मांडवातच दिले. हे मराठी गृहस्थ मद्रासला कुठेशी टायपिस्ट म्हणून `एक दोन वर्स नव्हे तर नांपीस वर्स सर्विस करून परतले होते.' बाकी पुण्यातल्या माणसाने मद्रासला टायपिस्टची नोकरी-तीही वट्ट चोवीस वर्स करीत राहणे ही घटना इतीहासात नोंदवण्यासारखी आहे. अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे-म्हणतात ते हेच! असो. हे विषयान्तर झाले. खरे म्हणजे जाणूनबाजून केले. कारण मूळ विषय इतका कडु आहे की त्याकडे वळणॆ नको असे वाटते.भर मांडवात एक पंचाहत्तरी गाठू लागलेला म्हातारा पैरणीची अस्तनी वर करून दंडाच्या बेटकुळीवर दणकून बुक्की मारा असा आग्रह धरून बसला होता. मी एक दोन बुक्क्या माझ्या ताकदीप्रमाणे मारल्या. पण त्याचे समाधान होईना."घाबरता काय?" तो कडाडला. ह्या तालीमबाज लोंकाच्या आवाजानदेखील एक प्रकारच्या बसकट दणका असतो. त्याने `हाणा' हे एवढ्या जोरात म्हटले की कसल्याशा विधीसाठी होमाच्या आसपास जमलेला सगळा घोळका `तमाम दहिने निगाह' केल्यासारखा एकदम आमच्या दिशेला बघू लागला."अय्या बाप्पांचे शक्तीचे प्रयोग सुरू झालेले दिसताहेत.". असा एक स्त्रीस्वर त्या घोळक्यातून उमटला आणि घोळक्याने पुन्हा होमात लक्ष घातले. मी बाप्पांच्या बेटकुळीवर आणखी एक चापटी मारली."चापटी काय मारताय कुल्ल्यावर मारल्यासारखी?" प्रस्तुत वाक्यातील चौथ्या क्रमांकाचा शब्द मी तरी भर मांदवात उचारला नसता. पण बाप्पांनी मात्र तो `हाणा'च्याच एवढ्या मोठ्याने उचारला. घोळक्यावर त्याचा परिणाम नव्हता. त्यानंतरदेखील बाप्पांच्या तोंडून जे काही बलसंवर्धनविषयक शब्द पडत होते ते ऎकल्यावर मला त्या होमात जाऊन उडी मारावी असे वाटत होते. बाप्पांनी माझी मूठ लचकेपर्यंत आपल्या दंडातल्या बेटकुळीवर बुक्क्या मारून घेतल्या. भर मांडवात अंगातली पैरण काढून पोटाला चिमटे काढायला लावले. बाप्पा "काढा चिमटा" म्हणून पोट असे काही टणक करीत्स की, त्यांच्या त्या पोटाला चिमटा काढण्यापेक्षा गोद्रेजच्या तिजोरीला चिमटा काढणे सोपे असावे असे मला वाटले. तो कार्यक्रम संपल्यावर त्यांनी जमिनीवर घट्ट बसकण मारले आणि "इथुन मला धक्के देऊन इंचभर हलवून दाखवा" म्हणून धक्के मारायला लावले."पुढच्या नारळी पौर्णीमेला पंचाहत्तरावं सरून शहात्तरावं लागतंय. दात पहा." बाप्पांनी माझ्यापुढे दात विचकले. मी बुक्के मारली. आणि एक गर्जानात्मक किंकाळी मांडवाचे छत फॊडुन गेली. दात बुक्की मारण्याच्या हेतूने दाखवण्यात आले नव्हते हे मला काय ठाऊक? कारण आतापर्यंत बाप्पांचा जो जो अवयव माझ्यापुढे आला तो बुक्का, गुद्दा चिमता किंवा धक्का मारण्यासाठी आला होता. मला वाटले तोच कार्यक्रम चालू आहे. कुणाचेही दात घशात घालणे, कुणावर दात धरणे वगैरे दातांचे जे खाण्याखेरीज इतर उपयोग आहेत ते करण्याकडे माझी अजोबात प्रवृत्ती नाही. बसकंडक्टरने `जगा नही' म्हटल्याक्षणी खाली उतरणारे आम्ही. केवळ गाफीलपणाने एका तालीमबाजाचा दात माझ्या हातुन पडला.ह्या शक्तीचे प्रयोगवाल्य़ांनी मला प्राचीन काळापासून पिडले आहे. माझा आरोग्य सांभाळून जगण्याऱ्यावर राग नाही. धोतराऱ्या निऱ्या काढून व्यवस्थित ठेवावे तसे ते आपले शरीर लख्ख ठेवतात. पण स्नायू फुगवून दाखवणारांचे आणि माझे गोत्रच जमत नाही. पहिलवान होणे हा माझा कधीही आदर्श नव्हता....आपण खुल्या ढंगाची कुस्ती खेळतो आहो... कुठल्या तरी भयाकारी पहिलवानाला लाथाबुक्या मारतो आहो... तो आपली गर्दन मुरगाळतो आहे... मग आपण त्याच्या नाकाचा शेंडा चावतो आहो.. मग त्याने आपल्या कानशिलात भडकवली आहे... मग आपण मुंडक्याच्या ढुशीने त्याचे माकडहाड मोडले आहे... मग तो कोसळला आहे...मग त्याचा मोडका हात उचलून दसऱ्याच्या रेड्यासारखे रक्तबंबाळ होऊन आपण उभे आहो आणि मग लाखो लोक आपल्या ह्या कुणाची तरी हाडे मोडल्याच्या आणि लाथाबुक्क्यांचा खुराक खाल्ल्याच्या शतकृत्याबद्दल टाळ्या वाजवता आहेत...हे माझे माझ्या भविष्याबद्दलचे स्वप्न कधीही नव्हते. इंग्रज हा देश सोडून जाईल ही कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वात मोठे स्वप्नचित्र पाहत असे ते एकच : आपल्या ड्राफ्ट्मध्ये यत्किंचितही खाडाखोड न करता तो ऍप्रूव्ह करुन साहेबाने टायपिंगला पाठवला आहे... कधी कधी हसून स्वत: होऊन आमच्या नावाचा उच्चार करून गुडमॉर्निंग केले आहे.एकदा मी माझ्या ह्या साऱ्या शंका एका गुरूजीना, आधी त्यांच्या बेटकुळ्या, गर्दन, पोटऱ्या, मांड्या वगैरे अवयवांची तुफान तारीफ करून विचारल्या होत्या."समजा-" गुरूजी सांगू लागले, "समजा, तुम्ही रस्त्यातुन जाताना एखाद्याने तुमच्या मुस्काटीत मारली-"वास्तविक चालायला लागल्यापासून मी रस्त्यातून चालतच आलो आहे. पण आजवर कुणीही कारणाशिवाय माझ्या मुस्काटीत मारली नाही. ज्यांनी मारली त्यांना ह्या कामाबद्दल शाळाखाते पगार देत असे. त्यामुळे त्या वेळी माझ्या दंडात जरी बेटकुळ्यांच्या बेचाळीस पिढ्या नांदत असल्या तरी हात वर करणे मला शक्य नव्हते. मी कधी कुणाच्या मुस्काटीत मारली नाही, की कुणी माझ्या मारली नाही. अशा परिस्थितीत बगलेत छत्री आणि हातात मेथीची जुडी घेऊन तुटत आलेला चपलेचा आंगठा-घरी पोहोचेपर्यंत तरी न तुटो' अशासारखा भाव सदैव चेहऱ्यावर घेऊन जाणाऱ्या मज पामरावर कोणीही केवळ ताकद अजमवण्यासाठी म्हणूनसुद्धा हा मुस्काटीत मारण्याचा प्रयोग करील असे मला कधीही वाटले नव्हते."बोला की..." गुरूजींच्या घनगर्जनेने मी दचकुन भानावर आलो. "समजा, तुमच्या थोबाडीत एखाद्दाने हाणली..." शब्द बदलून गुरूजींनी पुन्हा तोच सवाल केला "काय? समजा. थोबाड फोडलं तुमचं तर काय नुसता गाल चोळीत बसाल?"आपण रस्त्यातुन चालताना केव्हातरी कोणीतरी माझ्या मुस्काटीत षोकाखातर एक हाणून जाईल या भितीने त्या दिवसावर नजर ठेवून चालू आयुष्य पहाटे उठून तालमीत जाऊन, ऱ्हां, ऱ्हीं, ऱ्हॅं, ऱ्हं करण्यात घालवावे हा सिद्धान्त मला तरी पटेना. पुन्हा गर्जना झाली..."किंवा समजा, एखाद्दाने तुमच्या पेकाटात लाथ हाणली..." गुरूजींनी हाणण्याचे स्थळ आणि हाणणाऱ्या अवयव फक्त बदलला."अहो, पण असं उगीचच कोण कशाला हाणील?" मी गुरुजींच्या लाथेच्या कक्षेबाहेर माझा देह नेऊन हा सवाल केला."समजा हाणली तर?""समजा हाणलीच नाही तर?"मी आयुष्यात प्रतीपश्र्न करायचे एवढे धैर्य कधीही दाखवले नव्हते. पण आजचा प्रसंग, स्थळ, पात्रयोजना सर्व काही निराळे होते. गुरुजी माझ्या पेकाटात लाथ सोडा, पण कानाच्या पाळीला करंगळीदेखील लावू शकले नसते. आपल्या पुतणीसाठी माझ्या चुलतभावाच्या स्थळाविषयी बोलणी करायला आले होते. त्यांच्या पुतणीला दांडपट्टा, फरीगदगा आणि वेताचा मल्लखांब उत्तम येत असून ती खोखॊच्या टीमची कॅप्टन होती. असल्या भांडवल्यावर माझ्या चुलतभावाने ती जोखीम स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती. संसारात दांडपट्टापेक्षा जिभेच्या पट्ट्याला आणि खो-खोपेक्षा लपंडावाला आधिक महत्व आहे, हे त्या आजन्म शक्तीचे सेव्हिंग्ज अकौंट सांभाळीत राहिलेल्या बजरबट्ट बेटकुळीवाल्याला ठाऊक नसावे. वधूपक्षाकडून हे गुरूजीच काय, पण साक्षात एकादा हिंदकेसरी जरी आला तरी बापजन्मी आखाड्यात ने गेलेल्या मुलाचा बाप त्याला क्षणात लोळवू शकतो. त्यामुळे माझ्या `समजा हाणलीच नाही तर?' ह्या सवालाला हिंदुविवाहपद्धतीच तारांबळ आणि चंद्रबळ होते. त्या बळावर मी गुरुजींना नुसत्या तोंडाने धोबीपछाड घातली होती. एवढ्या गडगंज ताकदीचा तो भीमरूपी महारुद्र माझ्या एका सवालाने गडबडला. ह्या जरत्कारुला असला उलटा सवाल विचारण्याचे धैर्य केवळ वरपक्षाचा प्रतिनिधी ह्या भुमिकेमुळे आले हे त्यांच्या ध्यानात आले असावे. कारण त्यानंतर "त्याचं असं आहे..." अशी मवाळ वाक्याची सुतळी जोडून त्यांनी पवित्रा बदलला. "बरं का... वेळ काय सांगून येते? त्यासाठी लाठी, बोथाटी, दांडपट्टा वगैरे शिकून ठेवावे-""अहो, पण हापिसात काय पोळीभाजीच्या डब्याबरोबर दांडपट्टा घेऊन जायचे की काय?"बाकी कधीतरी दांडपट्टा शिकुन हवेतले उडते लिंबू सपकन कापतात तशी आमच्या हेडक्लार्कची टोपी उडवून कापावी असा एक सुखद विचार माझ्या मनाला शिवून गेला. आणि नुसत्या विचाराने सुद्धा माफक घाम फुटला. खरे म्हणजे उद्या ताकद कमावलीच तर ती कोणाविरुद्ध चालवावी हा मला प्रश्र्न्च आहे. त्यापेक्षा भल्या पहाटे कुशी बदलून साखर स्वस्त झाली आहे, दुधाच्या बाटल्या आपोआप घरात येताहेत, ही अति मंजुळ स्वरात `चहा घेता ना~~' म्हणते आहे, हेडक्लार्क कामावर खुष आहे... वगैरे वगैरे स्वप्ने पाहायची सोडुन केवळ कल्पनेने उगीचच मुस्काटात मारणारे शत्रू निर्माण करून पहाटे तालमीत जाऊन बुभु:कार कशासाठी करायचे?जोरदार शत्रु लाभायलादेखील आपल्यात कुवत पाहिजे. आमच्या मुस्काटावर शकतीचा अंदाज घेणाराने शक्तीचे प्रयोग धर्मार्थ लावले तरच ते शक्य आहे. टिचकीच्या कामाला उगीचच कोणी पाची बोटांचा प्ण्जा कशाल वापरील?अंग कमवण्यापेक्षा अंग चोरण्याचे धोरण अधिक चांगले. नवाची गाडी गाठायला साडेआठापासून फलाटावर बसणारे आम्ही. गाडीत शिरायला आपण होऊन आजवर धक्काबुक्की करावी लागली नाही. मारली टणक माणसे ऎशा जोरात रेटत असतात की डब्याच्या दरवाजापुढे आपण नुसते उभे राहिलो की मागल्या रेट्याच्या बळावर आत शिरायला होते. `जगाचे याज्य दुबळे करतील' असे येशु ख्रिस्त उगीचच नाही म्हणाला. तो बिचारा आमच्यासारखा. त्याच्या दंडात बेटकुळी-विटकुळी काही नव्हती. पण मग एवढे बलदंड बेटकुळीवाले त्याला एवढे का भ्याले?जगातले बरेचसे तापत्रय ह्या असल्या कारणाशिवाय बळ साठवणाऱ्या लोकांनीच निर्माण केले आहे. मग ते बळ कुणी सोन्यानाण्यांतून साठवतात, कुणी दंडांतून, तर कुणी बेटकुळीसारख्या टराटर फुगवलेल्या शब्दांतून! खिशात पैसा खुळखुळायला लागला की तो खर्च केल्याशिवाय चैन पडत नाही-खर्च करायला लागले की अधिक वाढवल्याशिवाय चैन पडत नाही. ह्या दंडमांड्यातली ताकदही वाजवीपेक्षा जास्त वाढली, की तीही खर्च करायची खुमखुमी सुरू होते. मग डोळे नसलेले शत्रू शोधले जातात. डॉन किशॉटला पवनचक्क्यात राक्षक दिसू लागले तसे ह्यांच्याही कल्पनेत राक्षक दिसू लागतात. आपल्या मानेची गर्दन झाली की दुसऱ्यांच्या माना मुरगळण्यासाठीच आहेत असे वाटू लागते. मग जो तो आपापल्या मानेची गर्दन करायला लागतो. मग हाताचे बळ अपुरे वाटायला लागते. "एखाद्याने मुस्काटीत मारली तर?" ह्याऎवजी `लाठी मारली तर?' असल्या कल्पनांची भुते उभी राहतात. मग लाठी अपुरी पडते. तलवारी येतात. तलवारीतून तीरकमठा येतो. बंदुका येतात. तोफा येतात. मग चतुर लोक पैसे खूळखुळावीत त्या तोफा तोफवाल्यासकट विकत घेतात आणि हां हां म्हणता दंडातल्या बेटकुळ्यांचे बॉंब होतात. मग शब्दांच्या बेटकुळ्या फुगवणारे काल्पनिक सवाल उठवतात, "समजा, एखाद्याने तुमच्यावर बॉंब टाकला तर?"...आणि भोवतालचे सुंदर युवतीचे मोहक विभ्रम, नुकतीच पावले टाकायला लागलेल्या बाळाचे एक पाय नाचिव रे गोविंदा... जयजयंतीतील तो लाडिवाळ फरक... हे सगळे सोडून यारी दिशांहून एकच सवाल उठतो, `समजा, तुमच्या कोणी मुस्काटीत मारली तर?', `समजा. कोणी तुमच्यावर कोणी बॉंब टाकला तर?'ह्या लोकांना, `समजा, तुम्हांला कोणी जेवायला बोलावले तर! श्रीखंड हवे म्हणाल की बिर्याणी?" . "समजा, तुम्हांला कुणी नाच पाहायला बोलावले तर, कथ्थक हवा म्हणाल की मणिपुरी?" . "समजा, एखादी तरुणी तुम्हांला म्हणाली की, सांग तु माझा होशिल का?" असले सवाल सुचतच नाहीत. कारण ह्या तऱ्हेऱ्हेच्या बेटकुळ्या आपण कशासाठी फुगवतो आहोत ह्या प्रश्र्नाला त्यांच्या कल्पनेतल्या मुस्काटीत मारणाऱ्या इसमापलीकडे त्यांना दुसरे उत्तरच नसते. मग मुस्काटीत मारणारा तो कल्पनेतला इसम असतो, धार्मीक गट असतो, वांशिक गट असतो, तर कधी देश असतो. मग शेख महंमदाने मारलेल्या लाथेप्रमाणे कल्पनेतल्या भांडणात खरी लाथ मारून माणसे काचेच्या सुंदर रंगीबेरंगी भाड्यांसारखी ज्यांना ही कल्पनेतली भुते छळत नाहीत अशा लोकांनी उभारलेली रंगीबेरंगी संस्कृतीची सूंदर पात्रे खळाळाकन फोडून टाकतात. त्या विध्वंसानंतर भानावर आल्यावर कळते की कूणी कुणाशी भांडत नव्हते. कारण ज्या घरातून आपल्यावर हल्ला होईल अशा भितीने आधीच बॉंब टाकून ते घर उदध्वस्त केलेले अस्ते- त्या घरात ते बॉंब पडण्याचा क्षणी एक आई मुलाला दुध पाजीत होती, एक कवी कविता रचत होता, एक शिल्पकार मुर्ती घडवीत होता, एक गवई तंबोरे जुळवीत होता आणि एका तरुणीचे ओठ तिच्या प्रियकराच्या चुंबनासाठी आतुर होते.फक्त कूणीतरी आपल्याला मारील या भीतीच्या भुताने पछाडले होते, वेळीअवेळी आपले दंड फुगवीत बसलेले आणि दुसऱ्याला ते सामर्थ्य दाखवण्यासाठी आसुसलेले दंडशक्तीचे उपासक, त्यांची पहाट गवतावरचे दवबिंदु पाहण्यासाठी नव्हती.हल्ली मांडवात मला कुणी दंडातली बेटकुळी वगैरे दाखवायला लागला, की मी विचारतो, "सनईवर चाललाय तो सारंग का हो?" उगीचच वर्तमानपत्री अधारावर कोणी कुठल्या दंग्यात हिंदू अधिक मेले की मुसलमान ह्याची चर्चा सुरू केली, की चक्क अब्दुल करीमखॉं साहेबांची रेकॉर्ड लावतो, `गोपाला मेरी करुणा क्यो नही आये' किंवा हरीभाऊ सवाई गंधर्वाच्या `तूं है मोहमदसा दरबार निजामुद्दीन सुजानी...' च्या तानांनी खोली भरून टाकतो.मला पहाटे उठवायची ताकद आहे ती फक्त ललत, भैरव, तोडी ह्या अशरीरिणी शुरांगना. `समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर'च्या कल्पनेतल्या भुतांनी पछाडलेल्यांना नव्हे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
गोडाउनमध्ये अजुन माल आहे
- Aug 31 (4)
- Jul 07 (1)
- Jun 14 (4)
- Jun 05 (4)
- May 28 (1)
- May 26 (1)
- May 21 (2)
- May 09 (1)
- May 07 (1)
- May 06 (1)
- May 02 (1)
- Apr 30 (1)
- Apr 29 (1)
- Apr 28 (2)
- Apr 26 (1)
- Apr 24 (3)
- Apr 22 (3)
- Apr 21 (1)
- Apr 20 (2)
- Apr 18 (2)
- Apr 17 (1)
- Apr 16 (4)
- Apr 15 (1)
- Apr 14 (2)
- Apr 12 (2)
- Apr 11 (2)
- Apr 10 (2)
- Apr 09 (5)
- Apr 08 (2)
- Apr 07 (3)
- Apr 06 (1)
- Apr 05 (3)
- Apr 04 (1)
- Apr 03 (2)
- Apr 02 (1)
- Apr 01 (1)
- Mar 31 (4)
- Mar 30 (5)
- Mar 29 (4)
- Mar 28 (9)
- Mar 27 (6)
- Mar 26 (3)
- Mar 25 (16)
- Mar 24 (6)
1 comment:
पु.लं.च्या साहित्याला तोड नाही. आपला ब्लॉग फ़ार सुंदर आहे.
Post a Comment